परमबीर सिंहांचा पाय आणखीन खोलात; दाऊदचा हस्तक छोटा शकीलची वसुली प्रकरणात एन्ट्री


मुंबई : आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलची मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर सुरु असलेल्या वसुली प्रकरणात एंन्ट्री झाली आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करणाऱ्या श्यामसुंदर अग्रवालच्या म्हणण्यानुसार, एका खोट्या प्रकरणात त्याला अडकवण्यात आले आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला. आपल्याला आणि कुटुंबियांना धमकावून वसुली करण्यात आली, असा आरोप श्यामसुंदर अग्रवालने केला आहे.

यासंदर्भातील वृत्त एबीपी न्यूजने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात एबीपीच्या हाती काही फोन रेकॉर्डिंग लागले असून ज्यात एक व्यक्ती बिल्डर संजय पुनमिया याला फोन करून धमकी देत असल्याचे ऐकू येत आहे. श्यामसुंदर अग्रवालबरोबरचा मुद्दा त्याने मिटवला नाही, तर त्याला जीवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा फोन अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय छोटा शकीलने केला होता. तर आपल्याला फसवण्यासाठी छोटा शकीलने आपले नाव घेतल्याची तक्रार शामसुंदर दासने केली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या मते, छोटा शकील याने या ऑडिओमध्ये संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी दिल्याचे ऐकू येत आहे. हा फोन ज्या नंबरवरुन आला होता, तो नंबर पोलिसांच्या क्राईम डाटानुसार छोटा शकीलचा असल्यामुळे 2016 सालच्या या ऑडिओ प्रकरणात शामसुंदर अग्रवालवर 17 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा नोंद करुन त्याला मोक्का लावला होता.

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शामसुंदर अग्रवाल याच्या तक्रारीवरुन परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. त्याचबरोबर परमबीर सिंह 2015 ते 2018 या कालावधीत बदलीनंतर जे घर वापरत होते, त्यासंदर्भातही त्यांना 24 लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे.