वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे पद्मश्री पुरस्कार मिळायला 11 वर्ष उशीर झाला


नाशिक : नाशिक पोलिसांनी नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील वादग्रस्त जमीन खरेदी केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या सुरेश वाडकर यांना दिलासा दिला आहे. पण या जमिनीच्या वादात अडकल्यामुळे पद्मश्री पुरस्कार मिळायला 11 वर्ष उशीर झाला. तसेच सरकारी अधिकारी, मोठमोठे राजकीय नेते यांनी दरम्यानच्या काळात कोणीच मदत केली नाही, अधिकारी तर केवळ वेळकाढू पण करत असल्याची खंत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.

नाशिक पोलिसांनी भूमाफिया विरोधात मोहिम उघडली असून जनजागृती भूमाफिया या लघुपटाची निर्मिती केली. त्याचा लोकार्पण सोहळा सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मी स्वतः भूमाफियाचा शिकार झालो होतो. लेटिकेशनची जमीन मला विकण्यात आली. मला माझ्या एका मित्रानेच फसवले, वादग्रस्त जमिन खरेदी केल्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची किंमत मोजावी लागली, असे वाडकर म्हणाले.

वाडकर म्हणाले, या प्रकरणाची राष्ट्रपती भवनातून चौकशी झाली. गुन्हा दाखल असल्यामुळे पद्मश्री पुरस्कारासाठी तब्बल 11 वर्ष मुकावे लागले. याकाळात आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत, असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी देखील दिलासा दिला नाही. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, विनोद तावडे यांच्यासह मोठमोठ्या नेत्याकडे गेलो, पण कोणी दिलासा दिला नाही. अधिकाऱ्यांनी तर फक्त वेळकाढूपणा केल्याचा आरोप वाडकर यांनी पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला. नाशिकमध्ये संगीत शाळा सुरू करणार असल्याचे देखील वाडकर यावेळी म्हणाले.