भारतात ‘डिजिटल करन्सी’ आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेची तयारी सुरु


मुंबई : डिजिटल करन्सी भारतात लागू करण्याकडे एक पाऊल पडत असून आता सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या माध्यमातून देशात डिजिटल करन्सी सुरु करण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. डिजिटल करन्सी देशभरात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. डिजिटल करन्सी लागू करण्याचा विचार जगभरातील अनेक देशांमध्ये सुरु आहे. भारतातही डिजिटल करन्सी लागू करण्याची गरज असल्याचे मत गेल्या आठवड्यात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. शंकर यांनी व्यक्त केले होते.

क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनसारखीच भारतात सुरु होणारी डिजिटल करन्सी असणार आहे. पण बिटकॉईनपेक्षाही त्यामध्ये अधिक पारदर्शकता असेल आणि ती कायदेशीर असेल. आरबीआयचे यावर काम सुरु असून लवकरच याबद्दलचे धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.

डिजिटल करन्सीवर फेब्रुवारी महिन्यामध्ये भाष्य करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की, देशात सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचा वापर करता येतो का याची चाचपणी सुरु आहे. डिजिटल क्रांतीमध्ये भारत कुठेही मागे राहता कामा नये, यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन डिजिटल करन्सीचा वापर करुन आपल्या पैशाचा व्यवहार करु शकतो. तिसरी व्यक्ती किंवा मध्यस्थाची यामध्ये गरज नसते. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट अॅपमुळे भारतातील हार्ड कॅश व्यवहार हे बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. या पेमेंट अॅपपेक्षाही अधिक सुलभता या डिजिटल करन्सीमुळे येण्याची शक्यता आहे.

अद्याप क्रिप्टोकरन्सीच्या वापराला भारतात मान्यता नाही. आरबीआय आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नसल्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही. या आधी आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.