शिवसैनिकांकडून मुंबई विमानतळावर लावलेल्या ‘अदानीं’च्या नामफलकाची तोडफोड


मुंबई – शिवसेनेने मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला विरोध करत त्याची तोडफोड केली आहे. विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची शिवसैनिकांनी तोडफोड करत तिथून हटवला आहे. अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. शिवसैनिकांनी त्याला कडाडून विरोध केला असून नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

१३ जुलैला अदानींकडे मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा देण्यात आल्यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्यामुळे शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी बोलून दाखवली होती.

अदानी एअरपोर्ट बोर्ड छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी गेटवर लावण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले होते की, ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे. त्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले होते. त्यामुळे कोणा उद्योगपतींच्या नावे विमानतळ ओळखले जाणार असेल तर मान्य नाही. ते महाराजांच्या नावेच ओळखले जावे.

ही तोडफोड शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असून अदानीने आपले नाव देऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणले जात आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

अदानी विमानतळ असे अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर लिहिले आहे. दुर्बिणीने पाहावे लागेल, एवढ्या छोट्या अक्षरात महाराजांचे नाव बाह्यांवर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. जेव्हा सांगूनही दुर्लक्ष केले जाते, तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. ते काय अदानीचे एअरपोर्ट आहे का? याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?, अशी विचारणा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

फक्त महाराष्ट्र, मुंबई किंवा देशापुरते छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव नसून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. याआधी जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या तिथे होत्या. पण त्यांनी कधीही विमानतळाला नाव दिले नाही. अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असताना जाणुनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का आणि कशासाठी करत आहेत? अशी विचारणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.