अतिवृष्टीमुळे बाधित असलेले एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये – बाळासाहेब पाटील


सातारा : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. या पंचनाम्यात एकही बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे बाधितांसाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे ज्या गावांची पाण्याची योजना वाहून गेली किंवा खराब झाली आहे, अशा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, ज्या गावांचा दळण-वळणाचा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे तेथे तात्पुरता रस्ता तयार करावा तसेच ज्या गावांमध्ये लाईट नाही त्या गावांमध्ये विद्युत वितरण कंपनीने तात्काळ काम सुरु करुन लाईटची व्यवस्था करावी. पंचनामा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी कमी पडत असले तर जिथे अतिवृष्टी झाली नाही, अशा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी मदत घ्यावी. शेतीचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांच्या खासगी विहिरींचेही पंचनामे करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केल्या.

अतिवृष्टीमुळे रसत्यांचे मोठे नुकसान झाले आहे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही अशा तालुक्यातील शाखा अभियंत्यांची मदत घ्यावी. तसेच पंचनाम्याची अंतिम यादी तयार करत असताना यादी स्थानिक आमदारांना दाखवावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनाबाबत धोरण निश्चित करावे. तसेच ज्या गावांना भूस्खलनाचा धोका आहे अशा गावांनी पुढे यावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी बैठकीत सांगितले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीत उपस्थित आमदारांनी उपयुक्त अशा सूचना केल्या.