नारायण राणेंनी फटकारलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रवीण दरेकर म्हणतात…


मुंबई – चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी नारायण राणेंचा एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यामुळे संताप झाला होता. यावेळी एका अधिकाऱ्याला नारायण राणे झापत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर यावेळी मध्ये बोलू पाहणाऱ्या कार्यकर्त्याला ‘थांब रे, मध्ये बोलू नको’ असे देखील नारायण राणे म्हणाले होते. या संपूर्ण घटनेवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे लोकांचा आक्रोश पाहून संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केल्याचे प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

चिपळूणच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यामुळे सुरुवातीला त्यांनी फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सांगत असताना त्यांनी सीएम, बीएम गेला उडत, असे देखील म्हटले. मी येथे बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नसल्याचे म्हणत राणेंनी संताप व्यक्त केला.

दरम्यान यानंतर त्यांनी सर्वांसमोर एका अधिकाऱ्याची कानउघडणी केली. तुमचा एकही अधिकारी येथे का नाही? लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, ते रडत आहे. विरोधी पक्षाचे नेते येथे आले आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये काय करत आहात?, असे नारायण राणे अधिकाऱ्याला सुनावत असतानाच प्रवीण दरेकरांच्या मागे उभा एक कार्यकर्ता बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर नारायण राणे सर्वांसमोर ‘थांब रे, मधे बोलू नको’ असं खडसावले. यानंतर नारायण राणे पुन्हा अधिकाऱ्याला खडे बोल सुनावण्यास सुरुवात केले. नारायण राणेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.