उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्यावर देवेंद्र फडणवीसांचे भाष्य


मुंबई – राजकीय विरोधक म्हणजे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आल्याच! मात्र, त्याही पलीकडे अनेक राजकीय नेत्यांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध हे स्नेहाचे असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध आणि नात्यावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. त्यांना मी कधीही फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो, असेही ते म्हणाले.

एबीपी माझाला याविषयी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, हो, मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. गेली २५ वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र राहिलो आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांसमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो.