न्यायालयाने फेटाळला राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज


मुंबई – मुंबईच्या न्यायालयाने पॉर्न रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तत्पूर्वी मंगळवारी न्यायालयाने राज कुंद्रा याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राचा सात दिवसांचा पोलीस रिमांड मागितला होता. पण, न्यायालयाने तिसऱ्यांदा रिमांड देण्यास नकार दिला.

अश्लील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्रा याचा सक्रिय सहभाग होता, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई क्राइम ब्रँचनेही राज कुंद्रा याच्या विरोधात ठोक इलेक्ट्रॉनिक पुरावे असल्याचा दावा केला आहे. पॉर्न फिल्मच्या बदल्यात व्यवहार केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांनाही मिळाले आहेत. त्याचबरोबर, अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणात सक्रिय झाले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने पॉर्न फिल्मच्या निर्मितीपासून आणि त्यांच्या ऑनलाइन रिलीजमधून गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान किमान १.२५ कोटी रुपये कमावले.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्राने तातडीने आपल्याकडील सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्याने आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज कुंद्राला २० जुलैला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. तर राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.