अनिल देशमुखांच्या मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी ‘सीबीआय’च्या धाडी


मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता सरकारी तपास यंत्रणा आपला तपास दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर, अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.

सीबीआयने आपल्यावरील कारवाईसाठी राज्य सरकारची मंजुरी घेणे अनिवार्य होते, असा दावा देशमुख यांनी केला होता. पण या प्रकरणी न्यायालयानेच चौकशीचे आणि पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यामुळे सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.