Tokyo Olympics : स्पेनवर भारतीय हॉकी संघाचा दणदणीत विजय


टोकियो : भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला पराभव मागे सारत मंगळवारी स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. स्पेनला भारताने 3-0 अशा फरकाने नमवले. पहिले दोन गोल भारताने पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागले, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. या विजयासह भारताने पुल ए मध्ये आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. सध्या भारत ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी कायम आहे.

4 क्वॉर्टरनंतर भारत आणि स्पेन यांच्यातील सामन्याचा निर्णय झाला आहे. तसे पाहायला गेले तर भारताने आपल्या विजयावर मोहोर सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्येच उमटवली होती. भारतीय हॉकी संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी खेळताना दिसून आला.

भारताकडून सिमरनजीत सिंहने पहिल्या क्वॉर्टरमध्येच 14व्या मिनिटाला गोड डागला. भारताने या गोलसोबत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच ऑलिम्पिकमधील सिमरनजीतचा हा पहिला गोल ठरला. त्यानंतर पुढच्या एका मिनिटाच्याच आत भारताला एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. ज्यावर रुपिंदर पाल सिंहने गोल डागत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये गोलचा डबल डोस पाहायला मिळाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघ आक्रमक खेळी करताना दिसून आले. तिसऱ्या क्वॉर्टरच्या शेवटच्या सेकंदाला स्पेनने एक गोल डागला, पण तोपर्यंत वेळ हातून निघून गेली होती. तिसरा क्वॉर्टर संपला होता. त्यामुळे स्पेनने डागलेला गोल व्यर्थ गेला. त्यावेळी स्पेनने पेनल्टी कॉर्नरची मागणी करत रिव्ह्यू घेतला. स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण स्पेनचा संघ गोल डागण्यात अयशस्वी ठरला.

पेनल्टी कॉर्नरच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताने गोल डागण्याची संधी हातून जाऊ दिली नाही. भारताकडून सामन्याच्या 51व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहने गोल केला. या सामन्यातील रुपिंदर पाल सिंहचा हा दुसरा गोल होता. या गोलसह भारताने सामन्यात 3-0 अशी आघाडी घेत, आपला विजय निश्चित केला.