आसाम आणि मिझोरममध्ये सीमावाद पेटला, गोळीबारात सहा पोलीस ठार तर 50 जखमी


गुवाहाटी : सीमावादावरुन आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये संघर्ष पेटला असून या वादाने आता हिंसक रुप धारण केले आहे. नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये गोळीबाराची घटना घडली, असून सहा पोलीस कर्मचारी त्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत, तर 50 कर्मचारी जखमी झाले आहेत. या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सुरु असलेल्या वादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असून दोन्ही राज्यांनी सीमेवर शांतता नांदावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.

आसामच्या बराक घाटीतील कछार, करीमगंज आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांच्या आणि मिझोरमच्या आयझॉल, कोलसिब आणि मामित या जिल्ह्यांची 164 किमीची सीमा लागून आहे. या दोन राज्यातील नागरिकांमध्ये गेल्या वर्षी, ऑगस्ट 2020 मध्ये सीमेवरुन वाद झाला होता.

पर्वतीय भागाची आसाम आणि मिझोरम ही दोन्ही राज्ये असून या राज्यांतील नागरिकांमध्ये जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांवरुन नेहमी वाद होतो. आसामच्या पोलिसांनी नुकतेच मिझोरमच्या नागरिकांना या सीमेवर शेती करण्यासाठी बंदी आणली आणि त्यांना तिथून हाकलवून लावले होते. त्यामुळे या दोन्ही राज्यांत सीमावादावरुन नव्याने वाद निर्माण झाला आहे.

आसाम पोलिसांनी एटलांग नदीच्या परिसरातील आठ झोपड्यांना आग लावल्याचा आरोप मिझोरमच्या पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मिझोरमच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरल्याचे सांगण्यात येत आहे. तर मिझोरमच्या नागरिकांनी आसामच्या पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान सहा पोलिसांच्या मृत्यूवर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून या सहा कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सीमेचे रक्षण करताना बलिदान दिल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या दोन राज्यांतील सीमावाद पेटला असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. वादग्रस्त सीमेवर शांतता नांदावी आणि हा मुद्दा सहमतीने सोडवण्यात यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.