म्हाडाच्या 9 हजार घरांच्या सोडतीला दसऱ्याचा मुहुर्त


मुंबई : तब्बल तीन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त मिळाला आहे. म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत यंदा दसऱ्याला निघणार असल्यामुळे मुंबई लगतच्या भागांत परवडणारी घरे घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यापूर्वी म्हाडाच्या घरांची सोडत 2018 साली निघाली होती. पंतप्रधान आवास योजनेतील 6500, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर 20 टक्के योजनेतील 500 घरांचा या सोडतीत समावेश आहे.

यंदा म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत दसऱ्याला निघणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही रखडली होती. पण आता मात्र ही सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. 2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती. यंदाच्या दसऱ्याला 9000 घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर येथे ही घरे असतील.

मुंबई आणि लगतच्या उपनगरांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, बऱ्याचदा मुंबईत घर घेणे परवडत नाही. पण म्हाडाच्या सोडतीमुळे ते आता शक्य होणार आहे.