‘द हिंदू’चे एन. राम यांची पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव


चेन्नई : पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी ‘द हिंदू’ या वृत्तपत्र समुहाचे संचालक आणि माजी मुख्य संपादक एन. राम आणि एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझमचे चेअरमन शशी कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एक समिती सर्वोच्च न्यायालयाच्या आजी किंवा माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात यावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी एका याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे. या प्रकरणी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, या स्पायवेअरचा वापर सरकारने कसा केला आहे याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करावी, अशी मागणी एन. राम आणि शशी कुमार यांनी केली आहे.

देशातील ज्या 40 लोकांवर पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली आहे त्यामध्ये ‘द हिंदू’ चे माजी मुख्य संपादक आणि सध्याचे संचालक एन. राम यांचा समावेश असल्याचे फ्रान्सच्या मीडियाने स्पष्ट केले आहे.

कोणत्या सरकारी यंत्रणेला या स्पायवेअरचा वापर करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि त्या माध्यमातून देशातील कोणत्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात आली याचा तपास करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशीही मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

केवळ जगभरातील सरकारांना पेगॅसस स्पायवेअर हे विकण्यात आल्याचे इस्रायलच्या एनएसओ ग्रुपने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतात याचा वापर केवळ भारत सरकारने केल्याचे स्पष्ट होते, असा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला आहे.

केंद्र सरकारने इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे. त्यानंतर देशात राजकीय रणकंदन सुरु झाले असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये यावरुन राडा झाल्याचे दिसून आले.