Tokyo Olympic : चिनी वेटलिफ्टरची डोप टेस्ट होणार; मीराबाई चानूला मिळू शकते सुवर्णपदक


टोकियो : भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळू शकते. चीनी वेटलिफ्टर होऊ जिहुईने ऑलिम्पिक 2020मध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर केले. चानूला हरवणाऱ्या होऊ जिहुईची डोप टेस्टिंग केली जाणार आहे. ती या टेस्टमध्ये जर फेल झाली, तर मीराबाई चानू सुवर्णपदकाची मानकरी ठरणार आहे.

भारताला टोकियो येथे सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळाले. भारताला पहिलं पदक मीराबाई चानूने मिळवून दिले. तिने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात रौप्यपदक मिळवले आहे. मीराबाई चानूने शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचलले, तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूने 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मीराबाई चानूने ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरे पदक मिळवून दिले आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील आपले रौप्य पदक मीराबाई चानूने देशवासियांना समर्पित केले आहे. मीराबाई चानूने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने म्हटले आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये काल मी पहिले पदक जिंकले. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझे पहिले पदक देशवासियांना समर्पित करते. तसेच मीराबाई चानूनं आपल्या यशाचं सर्व श्रेय देशवासियांना दिले. मीराबाई चानूने पुढे बोलताना म्हटले की, मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढे मोठ यश सर्व देशवासियांमुळे मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते.