अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा


कर्नाटक : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत असून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान येडियुरप्पा यांच्याकडून काढून घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत होत्या. आज अखेर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेटही घेतली होती. अशातच काही वेळापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे आज दुपारी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती.

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे सध्याचे वय लक्षात घेत नेतृत्त्वबदल करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांडने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. भाजपच्या हायकमांडने त्यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला असल्याचे सांगितले जात आहे. पण मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी या वृत्ताबाबत बोलताना नकार दिला होता. येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याची अफवा असल्याचे म्हणत हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते. पण आज अखेर त्यांनी राजीनामा दिला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा जर येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला, तर कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यांनी जर राजीनामा दिला, तर लगेच नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होईल. येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रल्हाद जोशी यांचे नाव सर्वात पुढे आहे . प्रल्हाद जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. उत्तर कर्नाटकमधून ते खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्यासह बीएल संतोष यांचेही नाव चर्चेत आहे. बीएल संतोष बऱ्याच वर्षांपासून भाजपचे संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावे देखील चर्चेत आहेत.