चीनमधील नानजिंग शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली


नानजिंग – चीनच्या वुहानमधून जगभर पोहचलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीनमधील नानजिंग शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. सोमवारी ७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीनंतर नोंद झालेली सर्वाधिक संख्या असल्यामुळे आरोग्य विभागाने या भागात चाचण्या करण्यावर भर दिला आहे.

नानजिंग विमानतळावर मागच्या आठवड्यात १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर नानजिंक लोकोउ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५२१ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच व्यापक स्वरुपात कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा धोका पाहता हजारो लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. कोरोनाबाधित आढळल्यामुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आतापर्यंत चीनमध्ये ९२ हजार ६०५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुलांना व्हॅक्सिन घेतल्याशिवाय शाळेत पाठवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाचे कोरोना लसीकरण करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर लसीकरणाशिवाय रुग्णालय आणि बाजारात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.