आज होऊ शकते बारावीच्या निकालाच्या तारखेची घोषणा


मुंबई : दहावीचा निकालानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून 12 वीचे निकाल 23 जुलैपर्यंत बोर्डाकडे पाठवा, अशा सूचना सर्व महाविद्यालयांना बोर्डाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 24 जुलैपर्यंत ही मुदत वाढवली होती. त्यानंतर पोस्टाने सुद्धा 25 जुलैपर्यंत महाविद्यालये निकाल बोर्डाकडे पाठवत होते. आता बोर्डाकडे महाविद्यालयांनी तयार केलेले निकाल आले आहेत, त्यावर प्रक्रिया सुरू असल्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या निकालाची तारीख आज बोर्डाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्याचे काम सुरू असताना मागील तीन ते चार दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती.

शिक्षकांना सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कॉलेजमध्ये येऊन बारावीच्या निकालाचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. शिवाय, बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे यामध्ये चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती.

बारावीच्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाने मूल्यमापन व गुणतक्ते वर्ग शिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस तर वर्ग शिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्यासाठी केवळ पाच दिवस दिलेले असून त्याची मुदत परवा 23 जुलै रोजी संपत होती. त्यानंतर ती मुदत एका दिवसासाठी वाढवली होती. त्यानंतर पोस्टाने सुद्धा 25 जुलैपर्यंत कॉलेज निकाल बोर्डाकडे पाठवत होते. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आले असून त्यावर प्रक्रिया सुरू आहे.