‘पॅरटमॅन’ बनण्यासाठी शस्त्रक्रिया करविणारा असाही पक्षीप्रेमी


टेड रिचर्ड्स या इंग्लंडमधील ब्रिस्टोलमध्ये राहणाऱ्या इसमांचा पोपटांवर विलक्षण जीव आहे. किंबहुना त्याला पोपट या पक्ष्याबद्दल वाटणारा जिव्हाळा इतका जास्त आहे, की पोपटाप्रमाणे दिसण्यासाठी टेड ने अनेक शस्त्रक्रियाही करवून घेतल्या आहेत. आता स्वतःला ‘पॅरटमॅन’ म्हणविणाऱ्या टेडने स्वतःच्या चेहऱ्यावर पंचरंगी पोपटाच्या पिसांच्या आकाराचे टॅटू बनवून घेतले आहेत. इतकेच नव्हे, तर टेडने स्वतःच्या डोळ्यांच्या आतही रंगेबिरंगी टॅटू करवून घेतले आहेत. आपला चेहरा पोपटाशी मिळता जुळता दिसावा यासाठी टेडने आपले कान कापवून घेतले असून, त्यामुळे त्याचा चेहरा आता पोपटाप्रमाणे दिसत असला, तरी त्याच्या ऐकू येण्याच्या क्षमतेवर साहजिकच या शस्त्रक्रियेचा परिणाम झाला आहे. अलीकडेच ‘ट्रॅव्हल’ या वाहिनीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘रिपलीज बिलीव्ह इट ऑर नॉट’ या मालिकेतील एक भाग टेडच्या पक्षीप्रेमावर आधारित होता.

आता टेड स्वतःची ओळख टेड ‘पॅरटमॅन’ अशी सांगत असून, त्याने करविलेल्या शस्त्रक्रिया कितीही धोकादायक असल्या तरी त्याला हवे असलेले बदल करवून घेताना त्याने अजिबात मागेपुढे पाहिले नसल्याचे टेड म्हणतो. प्रत्येकाला स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्या मनाप्रमाणे बदल करवून घेण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच या शस्त्रक्रिया आपण करविल्या असल्याचेही टेड म्हणतो. शस्त्रक्रिया धोकादायक असल्या तरी त्यासंबंधी आपण कधी फारसा विचार केला नसल्याचे सांगून असे विचार नकारात्मक विचारांना जन्म देणारे असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Leave a Comment