कामाचा व्याप आणि आरोग्य यांची अशी घाला सांगड


उत्तम आरोग्य ही कोणत्याही मनुष्याला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे असे म्हटले जाते. पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाच्या कामाचा व्याप वाढला असल्याने शारीरिक आणि मानसिक ताण वाढू लागला आहे आणि त्यामुळे जीवनशैली, खानपान या सर्वच गोष्टी झपाट्याने बदलत चालल्यामुळे याचा परिणाम अर्थातच आरोग्यावरही दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे कामाचे व्याप सांभाळतानाही उत्तम आरोग्य कसे जपले जाऊ शकते याचा विचार करणे अगत्याचे ठरते. आजची आपली जीवनशैली ही अतिशय वेगवान आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आपली इच्छा असूनही आपण वेळ देऊ शकत नाही. तज्ञांच्या अनुसार दिवसाला केवळ पंधरा ते वीस मिनिटांचा व्यायामही अश्या वेळी पुरेसा ठरत असतो.

त्याचसोबत आपल्या आहाराचे काळजीपूर्वक नियोजन केल्यानेही आरोग्यपूर्ण जीवन आणि कामाची व्यस्तता यांची सांगड घालणे शक्य होऊ शकते.
व्यायामासाठी वेगळा वेळ बाजूला काढणे शक्य नसले, तर दिवसभराच्या कामामध्येही शक्य तितकी शारीरिक हालचाल समाविष्ट केली जावी. ऑफिसमध्ये लिफ्ट ऐवजी जिने चढणे-उतरणे, ऑफिसमधेच जमेल तेव्हा चालणे असे केल्याने शरीराला थोडा फार व्यायाम नक्कीच मिळत असतो.

व्यायाम करण्यासाठी वेळच नाही, हे कारण प्रत्येक वेळी योग्य असतेच असे नाही. आरोग्याला आपल्या दृष्टीने महत्व असेल तर त्यासाठी वेळ काढणेही तितकेच महत्वाचे आहे. शारीरिक व्यायामासोबत मेडीटेशनसाठीही वेळ देणे गरजेचे असते. त्यामुळे कामामध्ये चित्त एकाग्र करणे सहज शक्य होते आणि आवश्यक व्यायाम मिळाल्याने शरीरामध्ये दिवसभराच्या कामासाठी उत्साहही टिकून राहतो. त्याचबरोबर आपला आहार चौरस असेल याची काळजी घ्यावी. प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, क्षार, आणि इतर पोषक तत्वे सर्वच शरीराच्या योग्य पोषणासाठी आवश्यक असतात. त्यामुळे एखादे पोषक तत्व निवडून दुसरे आहारातून अजिबात वर्ज्य करण्याच्या ऐवजी आपला आहार संतुलित असेल याची काळजी घ्यावी.

अन्न कमी खाण्याच्या ऐवजी योग्य वेळी योग्य आहार घेणेही तितकेच महत्वाचे ठरते. कामाच्या ठिकाणी बहुतेक वेळी अनेक कप चहा, चटपटीत स्नॅक्स यांची रेलचेल असते. याऐवजी आपल्या आहारामध्ये ग्रीन टी, आणि तर मसालेदार पदार्थांच्या ऐवजी लाह्या, फुटाणे, चणे, मोडविलेली कडधान्ये, ताजी फळे यांचा समावेश असणे जास्त चांगले. दिवसभर वातानुकुलित कार्यालयांमध्ये काम केल्याने शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी होत असते. अश्या वेळी कामाच्या व्यापातून वेळ काढून थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहणे आवश्यक असते. तसेच दिवसभराच्या कामाच्या व्यापातून स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढावा. त्यामुळे मनावरील तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment