Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सलामी, न्यूझीलंडवर 3-2 ने मात


टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत भारताने विजयी आरंभ केला आहे. शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आपली आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला आहे. हरमनप्रीतने भारताकडून दोन गोल केले, तर एक गोल रुपिंदरपाल सिंहने केला. आता रविवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत असणार आहे.

दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीने ऑलिम्पिकमध्ये तीरंदाजी स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीने चीनी ताइपे यांच्या जोडीला 5-3 अशी मात देत तीरंदाजी मिक्स्ड डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.

भारताची इलावेनिल वालारिवन टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल नेमबाजीत 16 व्या, तर अपूर्वी चंडेला 36व्या स्थानावर राहिली. प्राथमिक फेरीत दोघींचे आव्हान संपुष्टात आले आहे.

चीनच्या खात्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जमा झाले आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये चीनने सुवर्णपदक मिळवले आहे. चीनची यांग कियान हिने 251.8 स्कोअर करत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. यांग कियानने हा स्कोर करत ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड देखील केले आहे.