सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी धरणातून होणारा विसर्ग नियंत्रित – जयंत पाटील


सांगली : काल सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साधारणपणे 100 मि.मी. पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली आर्यविन पूल येथे पाणीपातळी 52 फूटापर्यंत पोहोचेल असा सुरूवातीचा अंदाज होता. पण काहीसा पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मर्यादित करण्यात आला.

सांगली शहरामध्ये पाणी अधिक प्रमाणात जावू नये यासाठी पाणी विसर्ग नियंत्रित करून आर्यविन पूल येथे 45 ते 46 फूटापर्यंत पाणीपातळी राहील या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राजापूर बंधाऱ्यावर कोयनेमधला विसर्ग हा जवळपास 45 हजार क्युसेक्सचा आहे. सातारा जिल्ह्यातील 4 धरणे व कोयना धरणामधील विसर्ग असा एकूण विसर्ग जवळपास 1 लाख क्युसेक्स आहे. सर्व मिळून राजापूर बंधाऱ्यातून पुढे जाणारा एकूण विसर्ग हा जवळपास 2 लाख क्युसेक्स पर्यंत आता असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.