एम्स प्रमुखांचे महत्वपूर्ण वक्तव्य, देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून होणार सुरुवात ?


नवी दिल्ली – सप्टेंबरपासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे संकेत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचे पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, माझ्या माहितीप्रमाणे जायडस कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहीमेला सुरुवात होऊ शकते.

देशात प्रौढांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 42 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 6 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी जवळपास दरदिवशी 1 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या दरदिवशी 40 ते 50 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. परंतु, आठवड्याच्या शेवटी ही संख्या आणखी घटते. सरकारचा उद्देश आहे की, 2021 च्या शेवटापर्यंत सर्वच 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, देशात लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक देशांमध्ये आपातकालीन मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, भारतात आतापर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिलेली नाही.

एम्सच्या संचालकांनी सांगितले की, लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपल्याला देशी लसीची गरज असल्यामुळे भारत बायोटेक आणि जायडस कॅडिलाची लस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फायझरची लसही लहान मुलांच्या लसीकरणासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु, आपल्याकडील लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे स्वदेशी लस असणे आवश्यक असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांसाठी अनेक लसी आपल्या देशात उपलब्ध होतील.