शिल्पा शेट्टीच्या घरावर मुंबई पोलिसांनी टाकला छापा


मुंबई – अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सोमवारी उद्योगपती राज कुंद्राला अटक केल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. डीएनए या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मुंबई न्यायालयाने शुक्रवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आज जिल्हा न्यायालयासमोर मुंबई पोलिसांनी कुंद्रा आणि थोर्पे यांना हजर केले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यता व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले, यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितले. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.