उद्या आयसीएसईच्या दहावी आणि आयएससीच्या बारावी परीक्षेचा निकाल


नवी दिल्ली – उद्या आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. https://www.cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी ३ वाजता निकाल पाहता येणार आहे. पहिल्यांदाच परीक्षा न घेता दहावी बारावीचा निकाल लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निकाल कधी लागणार?, याबाबत विचारणा केली जात होती. त्यानंतर आता उद्या निकाल लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निकाल www.cisce.org आणि www.results.cisce.org या दोन संकेतस्थळावर पाहता येईल. होम पेजवर ‘Results 2021’ यावर टॅप केल्यानंतर ICSE/ISC Year 2021 असे दोन पर्याय दिसतील. त्यानुसार त्यावर क्लिक करा. परीक्षार्थीला त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स क्रमांक आणि स्क्रिनवर आलेला कॅपचा कोड टाकावा लागेल. त्यानंतर निकाल दिसेल. त्यानंतर त्याखाली डाउनलोडचा पर्याय असेल तिथून निकाल डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना निकाल एसएमएसच्या माध्यमातूनही पाहता येईल. परीक्षार्थीला निकालासाठी त्याचा युनिक आयडी टाकून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तात्काळ रिझल्ट दिसणार आहे.

दहावी, बारावीच्या निकालाबाबत काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्जामिनेशनने (सीआयएससीई) अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. यंदा कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. तसेच अंतर्गत मूल्यांकनावरून निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बोर्ड नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर निकाल जारी करणार आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित असणार आहे.