प्रविण तरडेचा मनसेच्या दहीहंडीला पाठिंबा


देशभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आपला पाठलाग सोडत नाही आहे. सण आणि उत्सवांवर याचा परिणाम हा दिसत आहे. गेल्या वर्षी तर जवळपास सगळेच उत्सव हे एकतर रद्द करण्यात आले किंवा मग कमी लोकांच्या उपस्थितीत आपल्याला सण साजरे करावे लागले. यासगळ्यात यंदा कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर आता मनसेने दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. मनसेकडून यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर अभिनेता प्रविण तरडेने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फेसबुक पोस्ट करून मनसे नेते अभिजित पानसे यांनी हे जाहीर केले आहे. अभिजित यांनी ही पोस्ट फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे. विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार, असल्याचे पानसे यांनी म्हटले आहे. यावर आता प्रविण तरडेने १०० टक्के नाचायला येणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडीला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध कोरोना काळामध्ये लागू असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्रम असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेने विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे जाहीर केले आहे.