घरगुती गॅसबाबत केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय, सुरुवातीला महाराष्ट्रात पुणेकरांनाच लाभ


नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. कमी उत्पन्नात बहुतांश नागरिक कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. पण, इंधन आणि गॅसदरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच, सरकारने घरगुती गॅसबाबत एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

आपल्या आवडीच्या एजन्सीकडून गॅसधारक ग्राहकांना आता गॅसची खरेदी करता येणार आहे. कारण, आपणास हव्या असलेल्या एजन्सीकडे गॅस ट्रान्सफर करण्याची सूट देण्यात आली आहे. सध्या एकाच कंपनीकडे गॅस ट्रान्सफर करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात चंढीगड, पुणे, रांची, कोईम्बतूर आणि गुडगाव येथे ही सेवा सुरु करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण देशात ही योजना लागू होईल.

दैनिक जागरणशी बोलताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी सांगितले की, सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु करण्यात आली असून योग्यरितीने यशस्वी झाल्यास ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या एजन्सीमध्ये गॅस ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे, गॅस एजन्सींमध्ये ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याबाबत स्पर्धा होईल, असेही कपूर यांनी म्हटले.

गॅस एजन्सीचा नवीन योजनेमध्ये कुठलाही रोल असणार नाही. ग्राहकांना ऑनलाईन एलपीजी सिलेंडर भरतेवेळी कोणत्या एजन्सीकडून गॅस घ्यायचा हे ठरविण्याचा अधिकार मिळणार आहे. सध्या एका गॅस एजन्सीमधून दुसऱ्या गॅस एजन्सीत जाण्याची सुविधा ग्राहकांना नसल्यामुळे जेव्हा संपूर्ण देशात ही सेवा सुरू होईल, तेव्हा ग्राहकांना याचा लाभ मिळेल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, कोरोना काळात जीवनाश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याऐवजी सरकार दरवाढ करीत असल्याने नागरिक सरकारला दोष देत आहेत. विविध ग्राहक संघटनांसह महागाई कमी करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.