खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


मुंबई – १०० कोटी वसुलीचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केला होता. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. सिंह तेव्हापासून सातत्याने चर्चेच्या वर्तुळात आहेत. दरम्यान, आता सिंह यांच्याही अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

परमबीर सिंह यांच्यावर ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने गंभीर आरोप केला आहे. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ जणांची नावे एफआयआरमध्ये आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

या व्यावसायिकाने तक्रारीत आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप केला आहे. पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६७, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), १६६, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.