नवी दिल्ली : आपल्या कारमधील किंवा कोणत्याही गाडीतील इंधन संपल्यानंतर आपण पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरतो, पण अनेकदा गडबडीत पेट्रोल किंवा डिझेल भरायचे विसरुन गेलो, तर ऐनवेळी अडचण निर्माण होते. पेट्रोल पंपावरून एखाद्या कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल भरून देण्यास बंदी असल्यामुळे अशाप्रकारे पेट्रोल, डिझेल आणून ते कारमध्ये भरण्याची सोय आता नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेल भरायचे विसरले तर फारच मोठी समस्या निर्माण होते. आता बीपीसीएलने अशा अडचणीतून सुटका करणारी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या ग्राहकांसाठी सरकारी तेल कंपनी बीपीसीएलने घरपोच डिझेल उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरू केली आहे. ही अभिनव सुविधा सध्या देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने हमसफर इंडिया या कंपनीशी करार केला आहे.
देशाच्या राजधानीत मिळणार घरपोच डिझेल
कंपनी याकरिता 20 लीटरच्या जेरीकॅनमध्ये डिझेल वितरित करणार आहे. केवळ 20 लीटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणारे ग्राहकच या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यापेक्षा अधिक डिझेलची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या ही डोअरस्टेप सुविधा उपलब्ध नाही. कंपनी या वितरणात सर्व सुरक्षितता बाळगणार आहे. दिल्लीनंतर इतर राज्यांतही ही सेवा दाखल करण्याची सरकारची योजना आहे. सुरुवातीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या राज्यांमध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स दुर्गम भागात आहेत. येथील लोकांना कंपनी मोटारसायकलींवरून व्यक्ती पाठवून ही सुविधा पुरवेल.
ग्राहकांना यापूर्वी डिझेल खरेदीसाठी रिटेल दुकानदारांकडे जावे लागत होते, त्यात अनेक अडचणी येत असत. कंपनीच्या अधिकृत डोअरस्टेप डिझेल वितरण सुविधेमुळे या अडचणी दूर होतील. लोकांना अधिकृत पद्धतीने योग्य किंमतीत उत्तम दर्जाचे डिझेल यामुळे उपलब्ध होईल. सफर 20 (Safar 20) नावाच्या या जेरीकॅनमधील डोअरस्टेप डिझेल वितरण सुविधेमुळे अनेक लोकांना फायदा होईल. लघु उद्योग, मॉल्स, रुग्णालये, बँका, बांधकाम साइट्स, शेतकरी, मोबाइल टॉवर्स, शिक्षण संस्था यांनाही याचा लाभ होईल. अलीकडेच डिझेलचा घरपोच घाऊक पुरवठा सुरू झाला आहे. आता या नवीन सुविधेचा फायदा कमी प्रमाणात डिझेलची गरज असलेल्या ग्राहकांना होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.