बीएस येडियुरप्पा यांनी दिले कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याचे संकेत


बंगळुरु : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याचे संकेत बीएस येडियुरप्पा दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केले. मला 25 जुलैला हायकमांडकडून नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केले आहे.

बुधवारी रात्री बीएस येडियुरप्पा यांनी ट्विट करुन केंद्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा होती. मला भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे. पक्षाच्या आदेशाचे पालन करत सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पक्षशिस्तीचे पालन करावे. आंदोलन किंवा बेशिस्तीचे दर्शन घडवून पक्षाला लज्जास्पद ठरणारे वर्तन करु नये, असे ट्विट त्यांनी केले होते.