आरोग्य मंत्रालयाने जाहिर केली आतापर्यंत राज्यांना किती कोटी लसी दिल्याची आकडेवारी


नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये कोरोना लसींच्या मुद्द्यावरुन सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला बिगरभाजप राज्यांकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसुख मंडविया यांनी आरोग्य मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्राच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अपुऱ्या लसीकरणासाठी राज्येच कशी जबाबदार आहेत, हे आरोग्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे.

अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आतापर्यंत राज्यांना वितरीत करण्यात आलेल्या लसींची आकडेवारी गुरुवारी देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना 43,79,78,900 लसी वितरीत केल्या आहेत. यापैकी 40,59,77,410 लसींचा वापर झाला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. पण, त्याची स्वतंत्र आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नमूद केलेली नाही.