
मुंबई : आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश सुपूर्द केला.
भाजपकडून स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड
हा छोटेखानी कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या कुटुंबियांवर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.
