लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या, राज ठाकरेंची मागणी


मुंबई – राज्यावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट होताना दिसत असल्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असे असले तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध लागू करताना सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. अद्याप ही बंदी उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.


मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. राज ठाकरे यांनी त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात लोकलमधून प्रवास करण्यासंदर्भातील निर्णय तातडीने घेण्याचा सल्ला राज यांनी दिला आहे. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीने सुरू करावी, असे राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.