मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नये, असा आदेश दिला, असला तरी तो धुडकावत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावले आहेत.
पुण्यातील बेकायदा जाहिरातबाजीच्या प्रश्नावर भडकले अजित पवार
दरम्यान भाजपकडून एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. बॅनर, जाहिराती केल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून, तो निधी कोरोना नियंत्रणासाठी द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पण तरीही शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर माध्यमांनी प्रश्न विचारले असता अजित पवार भडकले.
२२ जुलै रोजी अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचे वर्ष लक्षात घेता, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले, तर या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिले आहे. सध्या शहरभर या पोस्टर वॉरची चर्चा रंगली आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच भडकले.
पत्रकारांकडून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांनीही होर्डिग लावले असल्याचे विचारण्यात आले, त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, मी गुन्हेगारांना होर्डिंग लावायला सांगितले होते का? आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केले आहे. जर कोणी काही केले, असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. मी पिपंरी चिंचवडमध्ये आज आलेलो नाही. माझी मते पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत. तुम्ही काहीतरी नविन मुद्दा काढण्यासाठी प्रश्न काढायचा, हे धंदे बंद करा. अनिधकृत होर्डिंग लावा, हे मी सांगितले नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. जर चूकीची होर्डिंग लागली असतील तर भाजपची येथे सत्ता आहे. तेथील आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी, असे अजित पवार म्हणाले.