नाव अन् लूक बदलून भारतात टीक-टॉक पुन्हा लॉन्च होण्याची शक्यता


लवकरच पुन्हा एकदा भारतात प्रसिद्ध चिनी व्हिडीओ शेअरिंग अॅप टीक-टॉक वापसी करण्याची शक्यता आहे. टीक-टॉक PUBG प्रमाणेच नवे नाव आणि लूकसह लॉन्च केले जाऊ शकते. टेक रिपोर्टनुसार, टीक-टॉकची मालकी असलेली कंपनी ByteDance ने आपल्या शॉर्ट व्हिडीओ अॅपच्या नव्या ट्रेडमार्कसाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटेंटस, डिजाइन अॅन्ड ट्रेड मार्कमध्ये अप्लाय केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये 56 चिनी अॅपवर बंदी घातली होती. ज्यामध्ये टीक-टॉकचाही समावेश होता. सरकारने बंदी घातल्यानंतर टीक-टॉक सर्वच अॅप स्टोअरवरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर भारतीय यूजर्ससाठी टीक-टॉक कुठेच उपलब्ध नव्हते.

टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीक-टॉकची मालकी असलेली कंपनी ByteDance द्वारे 6 जुलै फाईल करण्यात आलेल्या या नव्या ट्रेडमार्कमध्ये टीक-टॉकची स्पेलिंग बदलण्यात आली आहे. यावेळी कंपनीने TickTock या नावाने ट्रेडमार्कसाठी अॅप्लिकेशन दिले आहे. हे ट्रेडमार्क नियम, 2002मधील चौथ्या शेड्यूलच्या Class 42 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आपले अॅप भारतात पुन्हा लॉन्च करण्यासाठी ByteDance केंद्र सरकारसोबत चर्चा करत आहे. केंद्र सरकारला कंपनीने विश्वास दिला आहे की, ते नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व आयटी नियमांचे पालन करतील. दरम्यान, ByteDance ने 2019 मध्ये बॅन होण्यापूर्वीच भारतात आपले चीफ नोडल आणि ग्रीवेन्स ऑफिसर नियुक्त केले होते. हे नव्या आयटी नियमांच्या महत्त्वाच्या अटींपैकी एक आहे.

भारतात शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉक खास प्रसिद्ध होते. टीक-टॉक बॅन करण्यात आले, त्यावेळी देशात जवळपास 20 कोटी युजर्स होते. टीक-टॉक बॅन झाल्यानंतर फेसबुकच्या इंस्टाग्राम आणि युट्यूबने याच पार्श्वभूमीवर नवे फिचर लॉन्च केले होते. इंस्टाग्रामवर Reels आणि YouTube वर Shortsच्या नावाने युजर्ससाठी शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्याचे फिचर देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अनेक शॉर्ट व्हिडीओ अॅप्सही युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.