राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी प्रकरणात राखी सावंतची उडी


पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली. मुंबई क्राइम ब्रांचने सोमवारी रात्री राज कुंद्रा याला अश्लील फिल्म बनवण्याच्या आरोपावरून अटक केली. राज कुंद्राला न्यायालयात हजर केल्यानंतर २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बॉलिवूड क्षेत्रात या बातमीमुळे एकच खळबळ माजली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर प्रत्येक जण यावर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. अशातच बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंतची सुद्धा प्रतिकिया आली आहे. राखा सावंतने या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना राज कुंद्राची बाजू घेतली आहे.

राखी सावंतने ही प्रतिक्रिया सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीसोबत बोलताना दिली आहे. राखी सावंत यावेळी म्हणाली, बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी शिल्पा शेट्टीने खूप मेहनत घेतली आहे, हे प्रयत्न तिचे नाव खराब करण्यासाठी सुरू आहेत. राज कुंद्रा एक उत्तम व्यक्ती आहे. त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे काही राज कुंद्रा करू शकतो, यावर विश्वासच बसत नाही.


हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. राखी सावंत या व्हिडीओमध्ये म्हणाली, राज कुंद्रा एक उत्तम उद्योजक आणि समाजसेवक आहेत. त्यांना कुणीतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलिवूडमध्ये बरीच मेहनत घेऊन शिल्पा शेट्टीने स्वतःचे नाव कमवले आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. त्यांच्यावर खोटे आरोप करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे.

राखी सावंतने राज कुंद्रा अटक प्रकरणात आपली प्रतिक्रिया देताना शिल्पा शेट्टीचे भरभरुन कौतुक केले. राखी सावंत यावेळी म्हणाली, मला आठवते, राकेश रोशन यांचे ‘क्रेझी 4’ मधील ‘तुझे टुक देखे’ या आयटम साँगसाठी सुरूवातीला शिल्पा शेट्टीवा ऑफर आली होती. तिने जेव्हा मला सांगितले की गाणे तिला नाही करायचे. त्यावेळी ते गाणे मला देण्यासाठी सांगितले. त्यानंतर शिल्पा शेट्टीने राकेश रोशन यांना माझे नाव सुचवले.