पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते रिलीज करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रासह आणखी एकाला अटक


मुंबई – मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात मोठी कारवाई केली. मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला अटक केली आहे. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला नवी मुंबईतील नेरूळमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रासह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील काही जामीनावर सुटले आहेत.

पोलिसांनी सोमवारी पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. राज कुंद्रा पॉर्न फिल्म्स निर्मितीत मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटले होते. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे रायन जॉन थार्प असे नाव आहे. मालवणी पोलीस ठाण्यात रायन थार्प विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायन थार्पचे थेट राज कुंद्रा याच्यासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. रायनही पॉर्न चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी होता. दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांच्या एका पथकाने फेब्रुवारी महिन्यात मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. पण, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.