मुख्यमंत्री भर पावसात स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना


मुंबई – पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात उद्या म्हणजेच मंगळवारी (२० जुलै २०२१ रोजी) आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. आज दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणे शक्य नसल्यामुळे ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री मागील वर्षीप्रमाणे यंदाही स्वत: गाडी चालवत पंढरपूरला निघाले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचे हे दुसरे वर्ष ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा ताफा दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने जाताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपला. आज मध्यरात्री मुख्यमंत्री पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढीच्या पुजेआधी होणाऱ्या पुजेसाठीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होतील.

ते रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्यासोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या ताफ्यासोबत असणाऱ्या वाहनांची माहितीही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील वर्षी पहिल्यांदाच पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला शासकीय पुजेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली होती. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आठ ते नऊ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील वर्षी अशाचप्रकारे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली होती. अशाचप्रकारे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले आहेत.