जो शाखा अध्यक्ष चांगले काम करणार, त्याच्या घरी स्वतः जेवायला जाणार राज ठाकरे


पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तीन दिवसांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितल्यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे.

प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून, शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच जो शाखा अध्यक्ष चांगल काम करेल, त्याच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना सांगितले आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला तीन दिवस पुण्यात येऊन राज ठाकरे कामाचा आढावा देखील घेणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली आहे.

आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या पुणे दौर्‍यावर आहेत. या दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमाअंतर्गत संवाद साधला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना या बैठकीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सर्वांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कामाला सुरुवात करावी. प्रत्येक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवा, पक्षात काम करताना कायम सकारात्मक भावनेतून काम करा, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, आताच्या सरकारला लॉकडाउन हवा असे वाटते, तुम्हाला काम करून द्यायचे नाही. कायम तुम्हाला लॉकडाऊनमध्ये ठेवायचे असल्यामुळे या मानसिकतेतून आपण बाहेर पडून, जनतेच्या प्रश्नावर लढले पाहिजे. असे सांगून, सर्वांनी कामास सुरुवात करण्याचे आदेशही यावेळी राज ठाकरेंनी दिल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.