आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल


बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून आयुषमान खुराना हा ओळखला जातो. लवकरच आयुषमान एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘डॉक्टर जी’ असे असून या चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

आयुषमान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात अभिनेत्री रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून चित्रपटात आयुषमान आणि रकुल डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील आपला फर्स्ट लूक आयुषमानने स्वत: ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा लूक शेअर करत त्याने ‘डॉक्टर जी तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहे. आता चित्रीकरणास सुरुवात’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.


आयुषमानने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाची तोंड भरुन स्तुती केली होती. तो म्हणाला होता की, मी पहिले पान वाचताच या पटकथेच्या प्रेमात पडलो. ही खूपच सर्जनशील पटकथा आहे. प्रेक्षकांना हसवताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न हा चित्रपट करणार आहे. आयुष्यात मी पहिल्यांदाच एका डॉक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. मी ही भूमिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. ‘विक्की डोनर’, ‘बरेली की बर्फी’, ‘बधाई हो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटानंतर पुन्हा एकदा आयुषमान जंगली पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊससोबत काम करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रेक्षक ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.