मुंबईतून गुजरातला स्थलांतरित होणार अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे मुख्यालय


मुंबई – अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर आपले मुख्य कार्यालय आता मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय गतीने घेण्यास गुजरातमधून मदत होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने १३ जुलैला जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता मुंबईतून मुख्य कार्यालय गुजरातमध्ये हलवले जाणार आहे.

एअरपोर्ट सेक्टरमध्ये अदानी ग्रुप गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपले मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आरके जैन यांना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी दिली आहे. जैन सुरुवातीपासून कंपनीसोबत काम करत होते. त्याचबरोबर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ताबा मिळवण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम विमानतळ व्यवस्थापनाचा अदानी ग्रुपकडे ताबा आहे. त्याचबरोबर अदानी समूहाला जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क देण्यात आले आहेत. अदानी समूहाला लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.