शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांच्या श्रेयवादावरुन संघर्ष होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आता पुणे- नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरुन ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. कोल्हे यांच्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला आता अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, ज्या शब्दात माणूस टीका करतो, त्यावरुन त्याची संस्कृती कळते. त्यामुळे वैयक्तिक बाबींवर टीका करण्यात मला स्वारस्य नाही. कारण, माझ्या शिरुर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, जनतेशी कटिबद्ध आहे. मतदारसंघातील विकासकामांबद्दल जनतेला माहिती असल्यामुळे वैयक्तिक चिखलफेक करुन अकारण माझ्या शिरुर मतदारसंघाचे नाव वेगळ्या आणि चुकीच्या कारणासाठी चर्चेत आणणे मला योग्य वाटत नसल्यामुळे त्यांच्या टीकेवर कुठलेही उत्तर द्यायची मला आवश्यकता भासत नाही.

अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असल्याचे वक्तव्य केले. हे बोलण्याची त्यांची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय? आपण बोलतो काय? अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, तुम्हाला शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी मोठे केले आहे. राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल, तरी प्रकाश झोतात आणण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे देखील पाटील यांनी अमोल कोल्हे यांना उद्देशून म्हटले होते.