श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची का केली निवड?


आपल्याच स्वकीयांच्या विरुद्ध शस्त्र उचलावे किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश करीत त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. हाच उपदेश श्रीमद् भगवद्गीता म्हणून ओळखला गेला. कौरव आणि पांडव ज्या ठिकाणी युद्धासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकले, त्या कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हा उपदेश केला होता. कौरव आणि पांडवांमध्ये झालेले हे युद्धही भीषण होते. या युद्धाने दोन्ही पक्षांतील अनेक मातब्बर शूरवीरांचे, परिवारजनांचे देखील बळी घेतले. युद्ध संपुष्टात आले, मात्र या युद्धाशी निगडित अनेक प्रश्न आजही अनेकांच्या मनामध्ये कायम आहेत. या प्रश्नांपैकी एक मुख्य प्रश्न असा, की या युद्धा करिता श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राची निवड का केली असावी?

कौरव आणि पांडव यांच्यामध्ये अटळ असणारे युद्ध कुरुक्षेत्रामध्ये व्हावे हा निर्णय श्रीकृष्णाचा होता. मात्र युद्धासाठी याच ठिकाणाची निवड का करण्यात आली असावी या मागेही एक कारण सांगितले जाते. धर्मशास्त्रांच्या अनुसार कौरव आणि पांडव यांच्यामधील युद्ध अटळ झाले, तेव्हा त्या युद्धासाठी योग्य क्षेत्राचा शोध सुरु झाला. याच युद्धाच्या द्वारे धरतीवरील पापाचा अंत होणार असल्याने हे युद्ध महत्वपूर्ण समजले गेले होते. मात्र आपल्या विरुद्ध उभे ठाकणाऱ्या शत्रूंमध्ये आपलच स्वकीय आहेत हे पाहून कौरव आणि पांडव यांची मने द्रवून ते युद्ध करणार नाहीत अशी शंका श्रीकृष्णाच्या मनामध्ये होती. त्यामुळे पांडव आणि कौरव यांच्यामध्ये परस्परांसाठी द्वेषाची भावना कायम राहील अश्याच ठिकाणी हे युद्ध होणे महत्वाचे होते.

श्रीकृष्णाने आपले दूत, हेर चौफेर पाठवून अश्या ठिकाणाबद्दल माहिती काढण्यास सांगितले. सर्व दूतांनी ठीकठिकाणची माहिती काढून श्रीकृष्णापर्यंत पोहोचविली. त्यातील एका दूताने कुरुक्षेत्राबद्दल सांगितलेली माहिती कृष्णाला विशेष रोचक वाटली. कुरुक्षेत्रामध्ये दोन सख्खे भाऊ रहात असत. त्यातील धाकट्या भावाच्या शेतातील बांध वाहून गेल्याने पावसाचे पाणी मोठ्या भावाच्या शेतामध्ये घुसू लागले. मोठ्या भावाने धाकट्याला शेतावरील बांध पुन्हा बनवून घेण्यास सांगितले, मात्र धाकट्याने बांध बनविण्यास नकार दिला. या कारणामुळे संतप्त होऊन मोठ्या भावाने धाकट्या भावाला मारून टाकले, आणि ज्या ठिकाणी बांध वाहून गेला होता, त्याच ठिकाणी धाकट्या भावाचे शव पाणी रोखण्याच्या हेतूने तिथेच पुरले. या सर्व घटनेमध्ये केवळ राग, द्वेष इतक्याच भावना प्रकर्षाने आढळून आल्याने ही घटना ज्या ठिकाणी घडली, तेच ठिकाण युद्धासाठी योग्य असल्याचा निर्णय श्रीकृष्णाने घेऊन युद्धासाठी कुरुक्षेत्राची निवड केली. या भूमीवरील संस्कार, कौरव आणि पांडवांमध्ये असलेली द्वेषभावना निवळू देणार नाहीत याची खात्री श्रीकृष्णाला पटल्याने अखेरीस युद्ध कुरुक्षेत्रीच होण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment