झोपा आणि वजन घटवा


पुरेशी शांत झोप वजन घटविण्यासाठी आवश्यक आहे हे आता वैज्ञानिकांनी सिद्ध केलेले आहे. पण कधी काही कारणांनी आपल्याला शांत झोप लागत नाही. काही गोष्टींचा अवलंब केल्यास, शांत झोप लागण्यास आणि पर्यायाने वजन घटविण्यास मदत मिळू शकते. कित्येकदा संध्याकाळचा नाश्ता जरा जास्तच झाल्यामुळे रात्रीच्या जेवणावर पाणी सोडले जाते. काही वेळाने भूक लागल्याची भावना होऊन झोप येईनाशी होते. अशा वेळी एक ग्लास गरम दूध घेतल्याने भूक शमेल.

रात्री झोपताना, खोलीतील खिडक्यांमधून बाहेरील रस्त्यावरील दिवे किंवा वाहनांच्या दिव्याचा प्रकाश, खिडक्यांवर पडदे असूनही, खोलीमध्ये येत राहतो. या प्रकाशामुळे झोप लागणे अशक्य होते. अशा वेळी खिडक्यांवर गडद, जाडसर कापडाचे पडदे लावावे. झोपण्याच्या खोलीतील नाईट लॅम्पचा उजेडही मंद असावा. ऑक्सफर्ड विद्यापीठातील २०१४ साली केल्या गेलेल्या रिसर्चच्या अनुसार संपूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपणाऱ्या व्यक्ती जाड होण्याची संभावना कमी असते.

ज्या व्यक्तींच्या झोपेच्या आणि झोपेतून उठण्याच्या वेळा निश्चित असतात, त्या व्यक्तींच्या शरीरातील उर्जा किंवा कॅलरीज झोपेमध्ये देखील वापरल्या जात असतात, असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रीशन ने नमूद केले आहे. ज्यांची झोप आणि नियमित असते त्या व्यक्तींची शरीरातील उर्जा खर्च करण्याची क्षमता, झोप अनियमित असणाऱ्या व्यक्तींपेक्षा २० टक्के जास्त असते. अनियमित झोप असणाऱ्या व्यक्तींच्या शरीराचा मेटाबोलिक रेटही कमी असतो, त्यामुळे अश्या व्यक्तींना वजन घटविणे सहजी शक्य होत नाही. त्यामुळे झोपेची वेळ टाळून आपली आवडती टीव्ही सिरीयल बघण्यासाठी टीव्ही समोर बसण्यापूर्वी या गोष्टीचा विचार जरूर करा.

झोपेच्या नियमित सवयीमुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती आपल्याला मिळते. त्यामुळे रात्री शांत झोप लागण्यासाठी आपल्या खोलीतील टीव्ही बंद करावा. मोबाईल फोनचा वापर झोपेच्या वेळेआधी अर्धा तास बंद करावा. कित्येक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल फोनवर किंवा टीव्हीवर चित्रपट किंवा सिरीयल बघत बसण्याची सवय असते. टीव्ही किंवा मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांवर ताण तर येतोच, पण झोपेची वेळ टळून गेल्याने झोप लागण्यासही त्रास होतो. रात्री झोप उशिरा लागल्याने शरीराला अपुरी विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही थकवा जाणवत राहतो. त्यामुळे झोपेच्या वेळेआधी टीव्ही आणि मोबाईलचा वापर कमी किंवा बंद करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment