घरामधील इलेक्ट्रिक वायरिंगबद्दल अशी घ्या खबरदारी


घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष असल्याने विजेचा झटका लागून दर वर्षी भारतामध्ये दोन हजारांहूनही जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडत असतात. घरामध्ये असलेल्या एक्स्टेंशन कॉर्ड, जुनी विद्युत उपकरणे, पाणी, उष्णता अश्या अनके गोष्टींमुळे घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष उत्पन्न होत असून, त्यामुळे विजेचा झटका लागण्याचा धोका उत्पन्न होत असतो. अश्या प्रकारचा धोका घरामध्ये उत्पन्न होऊ नये यासाठी काही खबरदारीचे उपाय करणे अगत्याचे आहे. आजच्या काळामध्ये विद्युत उपकरणांचा वापर, ही चैनीची बाब राहिली नसून, गरज बनली आहे. पण ही विद्युत उपकरणे ज्या इलेक्ट्रिक वायरिंगवर अवलंबून असतात, त्यामध्ये दोष उत्पन्न झाल्यास गंभीर अपघात घडू शकतात. म्हणूनच घरामध्ये विजेची उपकरणे वापरताना घरातील इलेक्ट्रिक वायरिंगही दोषमुक्त राहील याची काळजी घेणे आवश्यक असते.

गेल्या काही काळामध्ये इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट्स होऊन आग लागल्याने अनेक गंभीर अपघात झाले असून यामध्ये जीवितहानीही झाल्याच्या घटना आपल्या ऐकण्यात आहेत. वायरिंग करताना योग्य ती काळजी न घेतली गेल्यामुळे, इलेक्ट्रिक वायरिंगजवळ पाण्याची गळती, विद्युत उपकरणे नीट ‘प्लग-इन’ न करणे अश्या अनेक कारणांनी विजेचा झटका लागण्याचा धोका उद्भवत असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरातील इतर सर्व वस्तूंची आपण योग्य ती काळजी घेतो आणि वस्तू जुन्या झाल्या की त्या बदलून नव्या वस्तू आणतो, त्याचप्रमाणे घरातील इलेक्ट्रिक वायरिंगचीही काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. आपण रहात असलेले घर वीस वर्षांहून अधिक जुने झाले असले, तर इलेक्ट्रिशियनला बोलावून आवश्यक असल्यास जुने वायरिंग आणि प्लग्स बदलून घेण्याचा विचार करता येईल.

एके काळी घरांमध्ये वापरली जाणारी विद्युत उपकरणे मर्यादित होती. त्याकाळी पंखे, दिवे, फ्रीज, आणि पाणी गरम करण्यासाठी गीझर प्रामुख्याने वापरले जात असत. पण आताच्या काळामध्ये या सर्व उपकरणांच्या सोबतच एसी, टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, आणि तत्सम आधुनिक उपकरणांचा वापर वाढला असल्याने जुने इलेक्ट्रिक वायरिंग या सर्व उपकरणांचा भार घेऊ शकेलच असे नाही. परिणामी वायरिंगमध्ये दोष उत्पन्न होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे आपल्या घरातील उपकरणांच्या वापराच्या अनुसार इलेक्रिर क वायरिंग करवून घेणे अगत्याचे आहे. घरामध्ये जितकी उपकरणे असतील तितके प्लग पॉइंट्स असणे ही आवश्यक आहे. अनेकदा एकाच प्लग पॉइंट वरून एक्स्टेंशन कॉर्डच्या मार्फत अनेक उपकरणांसाठी कनेक्शन घेतल्यानेही वायरिंगमध्ये दोष उत्पन्न होण्याचा धोका संभवतो. अनेक लहान उपकरणांसाठी एक्स्टेंशन कॉर्ड वापरायची झाल्यास ही कॉर्ड ‘वेदर रेझिस्टंट’ असून जास्त उपकरणांचा भार घेऊ शकेल याची खात्री करून मगच वापरावी.

घरातील किचन, बाथरूम्स, वॉशिंग मशीन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त असल्याने या ठिकाणचे वायरिंग वारंवार तपासणे आवश्यक आहे. अश्या ठिकाणी असलेली इलेक्ट्रिक आउटलेट्स ‘ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्रिटर'(GFCI)ने सुरक्षित केलेली असावीत. या यंत्रणेमुळे पाणी विजेच्या संपर्कात आल्याने शॉक बसण्याचा धोका उद्भवल्यास विजेचा प्रवाह आपोआप खंडित होतो. त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याचा वापर अधिक आहे त्या ठिकाणी ‘GFCI’ बसवून घेणे श्रेयस्कर ठरते. घरामध्ये फॉल्स सीलिंग किंवा माळे असल्यास त्याच्या आतील भागामध्ये असलेले वायरिंगही वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. अनेकदा एकत्र गोळा झालेल्या अॅक्टिव्ह वायर्स तापून त्याद्वारे खूप जास्त उष्णता निर्माण होत असते. आधुनिक वायरिंग १९० अंशापर्यंत तापमानामध्ये सुरक्षित राहू शकत असले, तरी यापेक्षा अधिक तापमान निर्माण झाल्यास वायरिंगमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. घरातील वायरिंगचा मेंटेनन्स किंवा वायरिंगमध्ये करावयाचे बदल तज्ञ इलेक्ट्रिशियन कडूनच करवून घ्यावेत. तसेच वायरिंग करण्यासाठी चांगल्या प्रतीची वायर आणि सर्किट ब्रेकर्स वापरले जातील याची खात्री करावी.

Leave a Comment