जाणून घेऊया अशीही रोचक तथ्ये


आपल्या अवतीभवती घडत असलेल्या नित्य नव्या गोष्टी सातत्याने आपल्या ऐकिवात येत असतात. आजकाल इंटरनेटमुळे केवळ आपल्या आसपासच्याच गोष्टींशी निगडित नाही, तर सर्व जगच जवळ आले असल्याने जगभरातील अनेक गमतीदार तथ्येही जाणून घेणे आता सहजसाध्य झाले आहे. अशीच काही मनोरंजक तथ्ये जाणून घेऊ या. अश्या मनोरंजक तथ्यांपैकी एक तथ्य आर्माडीलो या प्राण्याविषयी म्हटले पाहिजे. या प्राण्याच्या पाठीवर असलेले कवच अतिशय टणक असून, ते बंदुकीच्या गोळीनेही अभेद्य असल्याचा अनुभव अलीकडेच अमेरिकेमध्ये टेक्सास भागामध्ये राहणाऱ्या एका मनुष्याला आला. या मनुष्याने आपल्या घराच्या बागेमध्ये फिरत असलेले भले मोठे आर्माडीलो पाहिल्याने घाबरून जाऊन, त्याला मारण्यासाठी त्यावर स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडली. ही गोळी आर्माडीलोला लागली देखील, पण ही गोळी त्याच्या पाठीवरील टणक कवचावर लागल्याने आर्माडीलोला काहीच झाले नाही, पण टणक कवचावर आदळून ही बंदुकीची गोळी, जवळच उभ्या असलेल्या या मनुष्याच्या सासूला मात्र जखमी करून गेली ! आर्माडीलोच्या पाठीवर असलेले कवच केवळ टणकच नाही, तर बुलेटप्रुफही असते, हे अश्या रीतीने सिद्ध झाले.

शनी ग्रहाचा चंद्र टायटनविषयी रोचक तथ्य असे, की या चंद्राच्या आसपासच्या वातावरणामध्ये ९९% नायट्रोजन वायू आहे. उर्वरित एक टक्का मिथेन वायू असून, यामध्ये हायड्रोजनचे एकूण प्रमाण केवळ ०.१% इतकेच आहे. या चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती अतिशय कमी आणि वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने एखाद्या व्यक्तीने आपल्या खांद्यांना लहानसे पंख लावून, पंखांप्रमाणे हात हलविले, तर ही व्यक्ती टायटनवर चक्क उडू लागेल असे वैज्ञानिक म्हणतात !

आणखी एक रोचक तथ्य आहे अॅडम रेनर नामक एका ऑस्ट्रियन मनुष्याबद्दलचे. अॅडमचा जन्म ऑस्ट्रियातील ग्राझ या ठिकाणी १८९९ साली झाला. प्रथम विश्वयुद्धाच्या काळामध्ये अॅडमने सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी अर्ज केला असता, त्याची उंची केवळ चार फुट सहा इंच भरल्याने तो ‘ड्वार्फ’, म्हणजेच बुटका असल्याचे सांगून त्याला सैन्यामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. उंची अतिशय कमी असल्याने तो कमकुवत सैनिक ठरेल असे डॉक्टरांचे म्हणणे पडले, त्यामुळे अॅडमचे सैन्यामध्ये भर्ती होण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. मात्र विशेष गोष्ट अशी, की अॅडमच्या उंचीच्या मानाने त्याच्या हाता-पायांची लांबी जरा जास्तच लांब होती. ही गोष्ट देखील सैन्याच्या डॉक्टरांच्या नजरेतून सुटली नव्हती.

सर्वसामान्य मनुष्याच्या शरीराची वाढ साधारण वयाच्या एकविसाव्या वर्षी थांबून जाते. मात्र अॅडमच्या बाबतीत निसर्गाचा हा नियम लागू झालाच नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षीपासून अॅडमची उंची झपाट्याने वाढू लागली. वयाच्या एकतिसाव्या वर्षीपर्यंत अॅडमच्या उंचीमध्ये तब्बल दोन फुटांहूनही अधिक वाढ जाली असून, आता त्याची उंची तब्बल सात फुट एक इंच झाली होती ! अश्या प्रकारे उंची वाढण्यामध्ये काय कारण असावे याचा वैद्यकीय तपास केला गेला असता, अॅडमच्या शरीरामध्ये असेलेल्या एका दुर्मिळ ट्युमरमुळे त्याची उंची इतकी वाढली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पिट्युटरी ग्रंथी अत्यधिक प्रमाणात हार्मोन्स तयर करीत असल्यामुळे अॅडमची उंची झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे होते ! त्यामुळे जागतिक इतिहासामध्ये एकच माणसाला ‘ड्वार्फ’ आणि ‘सर्वात उंच मनुष्य’ असे दोन्ही खिताब मिळालेला अॅडम हा एकमेव मनुष्य ठरला आहे.

Leave a Comment