आहारातून साखर कमी केल्याने दिसून येतात हे बदल


आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आहारातील साखर कमी करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. इतकेच नव्हे, तर आता साखरेच्या पोत्यावरही, जास्त साखर खाल्ल्याने आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकत असल्याची सूचना लिहिलेली असणे सरकारच्या वतीनेच बंधनकारक करण्यात आले आहे. लोकांनी आहारातील साखर कमी करावी या साठी जगामध्ये किती तरी देशांमध्ये ‘शुगर टॅक्स’ लावण्यात येत आहे. परिणामी साखरेच्या अतिसेवानाने होणाऱ्या अपायांच्या बाबतीत लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण होऊन आता लोक साखरमुक्त आहाराला पसंती देत आहेत. साखर म्हणजे केवळ गोड पदार्थ नसून, ज्या पदार्थांमध्ये एडीबल शुगर्स असतात त्या सर्व पदार्थांचे माफक सेवन केले जाणे आवश्यक आहे. यामध्ये गोड पदार्थांच्या व्यतिरिक्त मैदा, स्टार्चयुक्त पदार्थ, फळांचे प्रोसेस्ड रस, प्रोसेस्ड अन्नपदार्थ अशा सर्व पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांचे सेवन कमी केल्यानंतर काहीच दिवसांमध्ये शरीरामध्ये निश्चित बदल दिसून येऊ लागतात.

साखर खाल्ल्याने मेंदू सक्रीय, सचेत होऊन नैराश्यपूर्ण मनस्थिती सुधारून उत्साह संचारतो, थोडक्यात मूड सुधारतो असे सामान्यपणे म्हटले जात असले, तरी आहारतज्ञांच्या मते जास्त साखर खाल्ल्याने नैराश्य येण्याची शक्यता ही अधिक असते. मनस्थिती सुधारण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या आईस्क्रीम, चॉकोलेट किंवा तत्सम गोड पदार्थांनी मनाला तात्पुरती उभारी येत असली, तरी हा ‘शुगर रश’चा प्रकार असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. एकदा का हा शुगर रश संपला, की शरीरातील उत्साह आणि मनाची उभारी दोन्ही चटकन नाहीसे होतात. त्याउलट आहारातील साखर कमी केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होऊन मनही प्रफुल्लित रहात असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. साखर सोडल्यापासून अवघ्या एका आठवड्यामध्ये हा बदल दिसून येतो.

आहारातील साखर कमी केल्याने त्वचेवर अकाली आलेल्या सुरकुत्या कमी होतात. आहारामध्ये साखर जास्त असली, तर त्यामुळे शरीरामध्ये ‘ग्लायकेशन’ नामक प्रक्रिया घडून येत असते. यामध्ये साखरेचे ‘मॉलिक्युल्स’ त्वचेतील कोलाजेनला चिकटून रहात असून, त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे आहारामधून साखरेचे प्रमाण कमी केल्यास त्वचा तरुण दिसू लागते. तसेच शरीरातील ग्लुकोज आणि इंस्युलीनच्या पातळींमध्ये होणारे चढ-उतारही आपोआपच कमी होत असून, शरीरावर सातत्याने दिसून येणारी सूजही कमी होऊ लागते. रात्रीच्या शांत झोपेकरिता मेलॅटोनीन नामक हार्मोनची आवश्यकता असते. साखर कमी केल्याने मेंदू हा हार्मोन अधिक प्रमाणात तयार करू लागतो आणि परिणामी रात्री झोप शांत आणि गाढ लागते. आहारातील साखर कमी केल्याने लिव्हरचे कार्य सुधारते, सर्दी पडसे होण्याचे प्रमाण कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते, आणि मधल्या वेळच्या भुकेसाठी वारंवार जंक फूड खाण्याची इच्छाही कमी होते. त्यामुळे वजनही आपोपाप नियंत्रणात राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment