शरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठी बळीचा बकरा करू नका : रामदास आठवले


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धोकेबाज नेते नसून ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार जर राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा असतील. पण, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नका, असे वक्तव्य पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. आठवले म्हणाले, ओबीसी समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यामुळे जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली, तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे, हे नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसींचा डेटा अंदाजे‌ तयार करण्यात आल्यामुळे केंद्र तो देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आठवले पुढे म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. विधानसभा अध्यक्षांची निवडणुक आमदार फुटतील या भीतीने पुढे ढकलण्यात येत आहेत. संसदेने मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी ठराव पारीत‌ करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईशी केंद्र सरकारचा काडीमात्र संबंध नसल्याचे आठवले म्हणाले.