पंतप्रधानांच्या हस्ते देशातील पहिल्या विमानतळाप्रमाणे सुसज्ज रेल्वेस्थानकाचे उद्घाटन


गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरच्या विमानतळाप्रमाणे सुसज्ज असलेल्या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे स्थानकाबरोबरच गांधीनगर ते वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गांधीनगर ते वरेठा या दोन नव्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. तसेच वडनगर येथील रेल्वेस्थानकाचे देखील पंतप्रधानानी उद्घाटन केले. ज्याठिकाणी पंतप्रधान मोदी लहानपणी चहा विकायचे.

एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुसज्ज असे देशातील पहिले रेल्वेस्थानक गांधीनगरमध्ये उभारण्यात आले आहे. विशेष प्रकाशयोजना, लक्झरी हॉटेल, लहान मुलांच्या खाण्यापिण्यासाठी खोली अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असे हे रेल्वेस्थानक आहे. दीड हजार प्रवासी येथून एकाच वेळी प्रवास करु शकतात. गर्दी वाढल्यास दोन हजार दोनशे प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता या रेल्वे स्थानकात आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष तिकिट आरक्षण, लिफ्ट, रॅम्प तसेच वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येत्या काळात मनोरंजन केंद्रे, शॉपिंग सेंटर, खाद्यपदार्थाचे स्टॉल उघडण्याचे येथे नियोजन आहे. स्टेशन आवारात कलादालन देखील आहे.