१९ जुलैपर्यंत खडसेंच्या जावयाला ईडीची कोठडी


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुणे येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या आठवड्यात अटक केली होती. गिरीश यांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. दरम्यान, विशेष न्यायालयाने त्यांना आता १९ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आली आहे.

गेल्या आठवड्यात मंगळवारी ईडीने गिरीश यांना चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली होती. गिरीश चौकशीत सहकार्य करत नाहीत, प्रकरणाशी संबंधित माहिती ते दडवत असल्याची माहिती ईडीने न्यायालयाला दिली होती.

ईडीच्या आरोपानुसार पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. या व्यवहाराविरोधात पुण्यातील एका व्यावसायिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीआधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.

ईडीने या घडमोडीचा आधार घेत समांतर तपास सुरू केला. ईडीने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला. ईडीने डिसेंबर महिन्यात खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.