ऋषभ पंतनंतर आणखी एक स्टाफ मेंबर कोरोनाबाधित


नवी दिल्ली – कोरोनाचा इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली असून सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी ऋषभ पंतला क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान पंत पाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर असल्याचे समोर आले आहे. संबधित सदस्याला विलगीकरणात ठेवण्यात आले असून तो संघासोबत डरहॅमला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आणखी ३ कोचिंग असिस्टंटनाही कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषभ पंतसह भारतीय संघातील आणखी चार सदस्य डरहॅमला जाऊ शकणार नाही. यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंटचा समावेश आहे. या चौघांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. इंग्लंड क्रिकेट संघावर कोरोनाचे सावट असतानाच भारतीय संघातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घसा खवखवण्याचा त्रास पंतला जाणवत होता. यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, असता ती पॉझिटिव्ह आली. मागील ८ दिवसांपासून ऋषभ पंत विलगीकरणात आहे. दरम्यान पंतच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये आढळणारा डेल्टा व्हेरियंट पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.